जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे समुदाय आरोग्य परिचर्या विभागाच्या वतीने प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेला प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘प्रोफेशनल एथिक्स, लिगल रिस्पॉन्सिबिलिटी अॅन्ड फॅकल्टी रोल मॉडेलिंग’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात अध्यापन क्षेत्रातील नैतिकता, कायदेशीर जबाबदाऱ्या आणि शिक्षकांची आदर्श भूमिका यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य महादेव गायकवाड तसेच शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या व्याख्याता रेबिका लोंढे उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना व्यावसायिक नैतिकतेचे तत्त्व, अध्यापनातील जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी आदर्श व्यक्तिमत्त्व कसे असावे याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. अध्यापन करताना नैतिक मूल्यांचे पालन आणि कायदेशीर चौकटीचे भान ठेवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख तसेच विविध विभागांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुदाय आरोग्य परिचर्या विभागातील व्याख्यात्यांसह इतर विभागांतील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थितांनी विविध शंका विचारत विषय अधिक समजून घेतला.
महादेव गायकवाड यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांना अध्यापन प्रक्रियेत येणाऱ्या नैतिक व कायदेशीर बाबींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सहभागी प्राध्यापकांनी हा कार्यक्रम व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे प्राध्यापकांच्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली असून नर्सिंग शिक्षणाच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केल्यास शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण बदल घडून येतील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या प्राध्यापक विकास कार्यक्रमामुळे नर्सिंग शिक्षणात नैतिकता आणि कायदेशीर जाणीव अधिक बळकट होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका अधिक प्रभावी ठरेल, असा एकूणच निष्कर्ष काढण्यात आला.



