Home राजकीय अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा !

अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा !


मुंबई-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली असतानाच त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुनेत्रा पवार यांची त्या पदावर नियुक्ती करण्याबाबत चर्चा सुरू असून पक्षातील अनेक नेते यासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी सांगितले की, अजितदादांच्या जाण्याच्या धक्क्यातून पक्ष अजून सावरलेला नाही. “आज कार्यालयात येणेही माझ्यासाठी भावनिक क्षण होता. या ठिकाणी दादांनी पक्ष संघटन उभे केले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठीच आलो,” असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार आणि कुटुंब सध्या धार्मिक विधींमध्ये व्यस्त असून ते पूर्ण झाल्यानंतर सर्व नेते चर्चा करून पुढील निर्णय घेतील.

तटकरे यांनी असेही नमूद केले की, कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल. “संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू महाराष्ट्राने अनुभवले. या भावनिक वातावरणात घाईचा निर्णय न घेता सर्वसंमती महत्त्वाची आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया देताना भावनिक शब्दांत शोक व्यक्त केला. “अजित पवार ज्या पद्धतीने गेले, त्यामुळे झोप उडाल्यासारखी झाली आहे. पण शेवटी ‘शो मस्ट गो ऑन’ हे वास्तव आहे. पक्ष आणि सरकार चालवण्यासाठी जबाबदारी कोणावर तरी द्यावीच लागेल,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, विधानमंडळातील पक्षनेत्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यात पक्षाच्या प्रमुख पदासह इतर जबाबदाऱ्यांवर निर्णय होऊ शकतो.

सुनेत्रा पवार यांना महत्त्वाची भूमिका देण्याबाबत कार्यकर्त्यांमध्येही मागणी वाढत असल्याचे भुजबळ यांनी मान्य केले. “लोकांची मागणी रास्त आहे. त्यात काही गैर नाही. पण अंतिम निर्णय सीएलपीमध्येच होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी याबाबत निश्चित माहिती नसल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्रीपद सध्या रिक्त असल्याने ते सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून भरता येईल का, यावर पक्षाचे लक्ष केंद्रीत असल्याचे संकेत आहेत. “उद्याच्या बैठकीत सर्वांचे एकमत झाले, तर उद्याच्या उद्या शपथविधीही होऊ शकतो,” असे सूचक विधान भुजबळ यांनी केले आहे.

एकूणच, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीमध्ये भावनिक वातावरण असले तरी निर्णयप्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. धार्मिक विधीनंतर पक्षांतर्गत चर्चेनंतरच उपमुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.


Protected Content

Play sound