पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषद मालकीच्या १८६ व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाढीव भाडेपट्ट्याचा आणि करार नूतनीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरपरिषद सभागृहात आयोजित एका विशेष बैठकीत प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेत, थकीत भाड्यात कपात आणि करारांना नऊ वर्षांची मुदतवाढ देण्याचे जाहीर केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून १८६ व्यापारी संकुलांच्या भाडेपट्ट्यातील वाढ आणि करार नूतनीकरण रखडल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, नगरसेवक प्रमोदशेठ कासार, मनीष पाटील, गोपालशेठ दाणेज, भूषण टिपरे, संदेश शिरोळे, बापू मिस्तरी, विनोद पाटील, पवार सर आणि पत्रकार अशोक ललवाणी यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार, सन २०१९-२० पासून थकीत असलेल्या सर्व गाळेधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्या कालावधीत लागू करण्यात आलेला अतिरिक्त भाडेपट्टा हा स्थायी निर्देशानुसार कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, व्यापाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन या गाळ्यांची मुदतवाढ आता पुढील नऊ वर्षांसाठी करून देण्यात येणार आहे. करार नूतनीकरण आणि गाळे हस्तांतरण करण्याची जी प्रकरणे तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होती, ती तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
या निर्णयामुळे नगरपालिकेचे उत्पन्न नियमित होण्यास मदत होईल आणि व्यापाऱ्यांवरील आर्थिक बोजाही कमी होईल. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थित व्यापारी बांधवांनी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत



