अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मेहेतर कॉलनी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना २७ जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख खान रहिम खान पठाण (वय ३४, रा. चुनाधामी, गांधीलीपुरा) हे मंगळवारी २७ जानेवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास मुस्लिम कब्रस्तान परिसरातून जात असताना ही घटना घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी विक्की घोगले आणि दिपक प्रभुदास लोहरे यांनी शाहरुख यांना अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शाहरुख यांनी विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण इतकी भीषण होती की, आरोपी दिपक लोहरे याने हातातील लाकडी दांडक्याने शाहरुख यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरात प्रहार केला. तर दुसऱ्या आरोपीने शाहरुख यांच्या डाव्या हाताच्या दंडावर मारून त्यांना जखमी केले. शाहरुख यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर गल्लीतील नागरिक धावून आले आणि त्यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई करत आहेत.



