अहमदाबाद- वृत्तसेवा । कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात शुक्रवारी (३० जानेवारी) सकाळी बॉम्बची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाचे अपहरण करून ते उडवून देण्याची धमकी एका टिश्यू पेपरवर लिहून ठेवण्यात आली होती. ही धमकी लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग केले.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे हे विमान कुवेतहून दिल्लीच्या दिशेने झेपावले होते. प्रवासादरम्यान एका प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला विमानातील वॉशरूममध्ये एक टिश्यू पेपर आढळला. त्यावर विमानाचे अपहरण (Hijack) करण्याची आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी हस्तलिखित स्वरूपात लिहिली होती. ही माहिती मिळताच विमानात भीतीचे वातावरण पसरले. वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) याची माहिती दिली आणि विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. सकाळी ६:४० च्या सुमारास विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.

विमान लँड होताच सुरक्षा यंत्रणांनी धावपट्टीचा ताबा घेतला. विमानात एकूण १८० प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा प्रवाशांची ओळख पटवून त्यांची चौकशी करत आहेत, जेणेकरून तो टिश्यू पेपर कोणी ठेवला याचा शोध घेता येईल.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून शाळा आणि विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या अफवांचे प्रमाण वाढले आहे. आजच्या घटनेमुळे प्रवाशांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागला असून, दिल्लीला पोहोचण्यासाठी त्यांना विलंब होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच विमानाला पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाईल.



