Home Cities जामनेर अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी; मंत्री गिरीश महाजन

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी; मंत्री गिरीश महाजन


जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।   येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना सर्वपक्षीय वतीने अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील नगरपालिका चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेत राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वर्गीय पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विमान दुर्घटनेतील त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, जामनेरमध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी एकत्र आले होते.

श्रद्धांजली सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादा पवार हे केवळ एक ज्येष्ठ नेते नव्हते, तर ते एक ‘दिलदार मित्र आणि दमदार नेता’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि निर्णयाचा वेग महाराष्ट्राने अनुभवला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून काढता येणार नाही. महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता आणि विकासाची दृष्टी असलेला नेता गमावला असल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी यावेळी दिली.

या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्त्वाचे आवाहन देखील केले. अजित पवार यांच्या मृत्यूच्या घटनेचे गांभीर्य मोठे असून, या विमान दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. मात्र, अशा दुर्दैवी घटनेत कोणीही राजकारण करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. ही वेळ राजकारण करण्याची नसून एका महान नेत्याला सन्मानाने निरोप देण्याची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्याची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत बाविस्कर, अरविंद चितोडिया, किशोर पाटील, भरत पाटील, प्रकाश पाटील, विश्वजीत, प्राध्यापक शरद पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्वस्थतेचा परिणाम निवडणूक प्रक्रियेवरही दिसून आला. नामनिर्देशनपत्र देण्याच्या पहिल्या दिवशी आणि आज गुरुवारी (२९ जानेवारी) राजकीय अस्वस्थतेमुळे जामनेरमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून समोर आली आहे.


Protected Content

Play sound