Home Cities अमळनेर अमळनेरात स्व.अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली

अमळनेरात स्व.अजितदादा पवार यांना सामूहिक आदरांजली


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर शहरात भावनांचा महापूर उसळला. शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून बारामती येथील अंत्ययात्रेचे थेट दर्शन घेत आपल्या लाडक्या नेत्याला सामूहिक आदरांजली अर्पण केली.

बारामती येथे गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेचे दर्शन अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्यासह शेकडो महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटिक, इम्रान खाटीक, पत्रकार पांडुरंग पाटील, शेखर पाटील, विजय शेखनाथ पाटील, भाजपाचे हिरालाल पाटील, शरद सोनवणे, विनोद कदम, भाऊसाहेब पाटील, माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांसह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

अंत्ययात्रेचे दृश्य स्क्रीनवर झळकत असताना वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. अखेरचा अग्निडाग दिला जाईपर्यंत सर्वजण स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करत होते. त्यानंतर “अजित दादा अमर रहे”च्या घोषणा देण्यात आल्या. अजितदादा यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून सामूहिक शांतिमंत्र म्हणत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी व महायुतीचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आमदार अनिल पाटील अमळनेरात आल्यानंतर सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

घटनेनंतर आमदार अनिल पाटील अत्यंत व्यथित अवस्थेत होते. बारामती येथेच असताना ते कोणाशीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र अंत्ययात्रेनंतर माध्यमांसमोर येत त्यांनी अश्रूंनी भावना व्यक्त केल्या. “आमचा बाप गेला… आम्ही आता कुणाकडे पाहायचं? माझ्या मतदारसंघात विकासाची एक-एक वीट अजितदादांनी रचली. दर मंगळवारी आम्हा आमदारांना बोलावून समस्या जाणून घ्यायचे. आता कुणाकडे त्या मांडायच्या? स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही घडेल,” असे भावनिक शब्द त्यांनी उच्चारले.

अमळनेरातील या सामूहिक आदरांजली कार्यक्रमाने स्व. अजितदादा पवार यांच्याबद्दल जनमानसात असलेले प्रेम आणि भावनिक नाते अधोरेखित केले. डिजिटल माध्यमातून घेतलेल्या या अंतिम दर्शनाने कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देता आला, मात्र त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कायमची जाणवत राहणार आहे.


Protected Content

Play sound