जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशातील शेतीभूमीचा घटत चाललेला कस, मातीतील जैविक कार्बनची घसरण आणि वाढते प्रदूषण या गंभीर समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ‘भूमी सुपोषण व संरक्षण’ हे राष्ट्रव्यापी जनआंदोलन संपूर्ण भारतात राबवले जात आहे. या व्यापक अभियानाचा भव्य शुभारंभ १९ मार्च २०२६ रोजी अमळनेर (जि. जळगाव) येथील मंगल गृह मंदिर येथे होणार असून त्यासाठीची तयारी वेगात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील योजना बैठकीचे आयोजन गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. या बैठकीत अभियानाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. बैठकीस अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोज सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, अमळनेर मंगलगृह मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले, राष्ट्रीय सह-संयोजक आलोक गुप्ता, अक्षय कृषी परिवाराचे सचिव डॉ. बेरमदम गुणाकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारतामध्ये सन २०२१ पासून कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी एकत्र येत भूमी सुपोषण व संरक्षणासाठी राष्ट्रव्यापी अनवरत जनअभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून हजारो गावांमध्ये भूमी पूजन व प्रबोधन कार्यक्रम राबवण्यात आले असून मातीचे महत्त्व आणि तिचे जतन करण्याचा संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. परिणामी अनेक शेतकरी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहेत.
कृषी व पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की शेतीभूमीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक संतुलन वेगाने ढासळत आहे. जमिनीत वाढणारे प्रदूषण आणि सेंद्रिय कर्बाचे अत्यल्प प्रमाण भविष्यात शेती उत्पादनासाठी मोठे संकट निर्माण करू शकते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संस्थांनी भूमी सुपोषणाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प केला आहे.
गेल्या पाच वर्षांत या अभियानांतर्गत देशभरात सुमारे ३० हजार गावांमध्ये आणि ५४ हजारांहून अधिक शहरी ठिकाणी भूमी पूजन व जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले. यामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध प्रयोग, तंत्रज्ञान आणि अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. यंदाही हे अभियान चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच १९ मार्च २०२६ पासून अक्षय तृतीया १९ एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण भारतात समाजाच्या सहभागातून राबवले जाणार आहे.
या उपक्रमात देशातील सामाजिक व धार्मिक संस्था, हजारो गौशाळा, स्वयंसेवी संस्था, सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानाअंतर्गत भूमी पूजन, भूमी सुपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, प्रशिक्षण शिबिरे, संगोष्ठी, कार्यशाळा, जागरूकता शिबिरे आणि प्रदर्शनांचे आयोजन केले जाणार आहे. शहरी भागात जैविक व अजैविक कचरा वेगळा करणे, जैविक कचऱ्यापासून खतनिर्मिती यासंबंधी जनजागृती कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. भूमी सुपोषणाशी संबंधित माहिती व साहित्य www.bhumisuposhan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या राष्ट्रव्यापी अभियानाचा शुभारंभ १९ मार्च २०२६ रोजी अमळनेर येथील मंगल गृह मंदिरात होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य माननीय भागैय्या जी, परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (कणेरी मठ) यांच्यासह अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक पद्मश्री पुरस्कारप्राप्त शेतकरी सुभाष शर्मा असून, नवल रघुवंशी (इंदूर) हे संयोजक आणि आलोक गुप्ता (दिल्ली) हे सह-संयोजक म्हणून अभियानाच्या अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावणार आहेत.



