जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रामराज्याच्या संकल्पनेला अधोरेखित करत धर्म, राष्ट्र आणि संस्कृती विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे रविवारी दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी दिली. मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर ही सभा होणार असून, यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जुवेकर बोलत होते. यावेळी प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांताचे ललित चौधरी, सकल हिंदु समाजचे राकेश लोहार आणि समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट उपस्थित होते. हिंदू समाजाचा इतिहास शौर्य आणि पराक्रमाचा असल्याचे सांगत धर्महित आणि राष्ट्रहितासाठी संघटित कार्य करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

सभेचा उद्देश हिंदू समाजाचे प्रभावी संघटन घडवणे हा असून, धर्माचरणाचे महत्त्व, सण-उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत, तसेच सांस्कृतिक परंपरांचे जतन यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जनार्दन हरिजी महाराज यांनी नमूद केले. समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सभास्थळी राष्ट्र, धर्म, अध्यात्म, देवता, सण-उत्सव, बालसंस्कार, आचारधर्म, व्यक्तिमत्व विकास आणि आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथ व माहिती फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी दिली. या प्रदर्शनातून समाजप्रबोधनाचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त सभेत उपस्थित हजारो नागरिक एकत्रितपणे संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन करणार असल्याचे राकेश लोहार यांनी सांगितले. यावर्षीच्या सभेला प्रमुख वक्ते म्हणून ३० वर्षे सैन्यात सेवा बजावलेले लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा उपस्थित राहणार असून, त्यांच्यासह सद्गुरू स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता बीरें इचलकरंजीकर आणि प्रशांत जुवेकर हे देखील विचार मांडणार आहेत.
एकूणच, धर्मजागृती, सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन आणि समाजसंघटन यावर भर देणारी ही सभा जळगावातील धार्मिक व सामाजिक वातावरणात महत्त्वाची ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून, मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या सभेच्या माध्यमातून धर्म, संस्कार आणि राष्ट्रभक्ती यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, विविध धार्मिक व सामाजिक विषयांवरील मार्गदर्शन आणि प्रदर्शन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
या वर्षी सभेत शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता याचे उदघाटन होणार असून सोमवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यास खुले राहणार आहे. याचा नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे शहर समन्वयक गजानन तांबट यांनी केले आहे.
३१ जानेवारीला सकाळी वाहनफेरी
राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे आकस्मिक दुर्दैवी निधन झाल्याने राज्यात ३० जानेवारी पर्यंत दुखवटा पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या प्रसारानिमित्ताने शनिवार ३० जानेवारी रोजी आयोजित केलेली वाहनफेरी ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. बिग बाजार (नेहरू चौक) येथून फेरीला आरंभ होऊन छत्रपती शिवराय स्मारक चौक पिंप्राळा येथे समारोप होणार आहे.



