जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या ऐतिहासिक आणि यशस्वी सॅटेलाइट मोहिमांवर आधारित पोस्टर प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञानाची गोडी, संशोधनाची आवड आणि देशाच्या अंतराळ यशाबद्दल अभिमान व्यक्त करणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची मोठी गर्दी उसळली होती.

या पोस्टर प्रदर्शनामध्ये इस्रोने आजवर अवकाशात पाठवलेल्या विविध महत्त्वाच्या सॅटेलाइट्स आणि मोहिमांवर आधारित माहितीपूर्ण व आकर्षक पोस्टर्स सादर करण्यात आले होते. यामध्ये आदित्य L1, चंद्रयान-3, IMS-1, रोहिणी RS-1, जीसॅट-14, एक्स-पो सॅट (XPoSat), मंगळयान (Mars Orbiter Mission), NVS-01 सॅटेलाइट, मेघा-ट्रॉपिक्स मिशन, SLV-3, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटेलिजन्स सॅटेलाइट आदी मोहिमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रत्येक सॅटेलाइटची उद्दिष्टे, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि भारताच्या अंतराळ संशोधनातील योगदान प्रभावीपणे मांडले.

या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सोयो सिस्टिम्सचे संचालक किशोर ढाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. माधुरी पाटील, कार्यक्रमाचे आयोजक व भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. बी. देशमुख तसेच परीक्षक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. दिलीप भारंबे उपस्थित होते.
या स्पर्धात्मक पोस्टर प्रदर्शनात एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. अंडरग्रॅज्युएट गटातून रेवेश रामेश्वर खराटे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर निंबेश कमाल बारेला याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्रिवेणी हेमंत पाटील, मुनिरा एम. शेख, तडवी तनुजा कसम आणि दिव्या सचिन पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
पोस्टग्रॅज्युएट गटामधून बाविस्कर प्रीती जगजीवन हिला प्रथम पारितोषिक मिळाले, तर पाटील जयेश गुलाबराव याला द्वितीय पारितोषिक देण्यात आले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील शास्त्रीय मांडणी, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. हर्षल गंगावणे, प्रा. विशाल तेली, प्रा. पानी सर, श्री राम पाटील, राजू सोनवणे आणि राजू पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता वाढीस लागली असून, इस्रोच्या कार्याबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.



