यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव मार्गावरील इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये नुकताच वार्षिक सामाजिक व सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि रंगतदार कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती आणि गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांसाठी अविस्मरणीय ठरला.

या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देवचंद पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन, पुणे येथील संजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप हुद्देदार उपस्थित होते. यावेळी डॉ. अर्चना हुद्देदार, आशिष मेहर, कमलेश बोरकर, दिपाली पेवेकर, शाळेच्या उपाध्यक्षा सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील, संजीवन हॉस्पिटलचे संचालक व शाळेचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, स्व. केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम मनिष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शारदा वंदन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणांनी संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगांनी नटले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जूनियर केजीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केवळ राजस्थान राज्यावर आधारित विविध नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणे केली. ‘खम्मा घणी सा’ या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजस्थानी पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून राजस्थानची लोकसंस्कृती, परंपरा आणि शौर्यगाथा प्रभावीपणे उलगडून दाखवली.
विद्यार्थ्यांनी राजस्थानचा इतिहास, तेथील वीरपुरुष व वीरांगणा, सामाजिक व सांस्कृतिक जीवन, चालीरीती आणि परंपरा नाट्यरूपातून सादर केल्या. रुदाली परंपरा, पन्नाधायचे बलिदान, राणी पद्मावती, महाराणा प्रताप, चेतकची शौर्यगाथा, राजपुताना रायफल्स, संत मीराबाई यांचे जीवनकार्य, कटपुतली कला, खाटू श्याम, पद्मिनी जौहर, पोखरण अणुचाचणी तसेच वंशावळ सांगणाऱ्या भाटांची परंपरा यांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेचा इतिहास आणि स्थापनेची माहितीही नाट्य माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडली.
या संपूर्ण सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी नृत्य आणि नाटकाच्या माध्यमातून संपूर्ण राजस्थान राज्याची सांस्कृतिक ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री सुभाष अहिरराव व सचिन सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी हर्षल मोरे, योगिता बिहारी, देवयानी साळुंखे, मिलिंद भालेराव, भावना चोपडे, राजश्री अहिरराव, प्रतिभा धनगर, गोपाल चित्ते, पवनकुमार महाजन, सोनाली कासार, प्रतिभा पाटील, योगिता सावळे, वैशाली मराठे, तिलोत्तमा महाजन, ज्ञानेश्वर धनगर, सोनाली पाटील, हर्षदा पाटील, नूतन देशमुख, सोनाली वाणी, पुरुषोत्तम पाटील, गोकुळ धर्माधिकारी, निलेश माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.



