रावेर/यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर व यावल तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या गारांच्या तडाख्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक दोघांनाही मोठा फटका बसला आहे.

या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग गंभीर संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनेक शेतांमधील उभी पिके आडवी झाली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांची पत्रे उडून गेली असून घरांतील साहित्याचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला तर रस्त्यांवर झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केले आहे. तसेच नागरिकांच्या घरांचे व मालमत्तेचे झालेले नुकसानही नोंदवून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू करण्यात आली असून पंचनामा प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जात आहे. शेतकरी व नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.



