Home धर्म-समाज कवडीवाले कुटुंबाकडून आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

कवडीवाले कुटुंबाकडून आईचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आजच्या डिजिटल युगात जिथे मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती धोक्यात आली आहे, तिथे यावल येथील कवडीवाले कुटुंबाने एक कौतुकास्पद आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रमाबाई रघुनाथ कवडीवाले यांच्या ८१ व्या वर्षपूर्तीनिमित्त (सहस्रचंद्र दर्शन सोहळा) चक्क त्यांची ‘पुस्तक तुला’ करून वाचन संस्कृती जतन करण्याचा संदेश देण्यात आला.

यावलमधील ऐतिहासिक कवडीवाले वाड्यात हा अनोखा सोहळा संपन्न झाला. सहसा साखर, गूळ किंवा मिठाईने तुला केली जाते, परंतु या कार्यक्रमात धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, चरित्रे, प्रवासवर्णने आणि बालसाहित्यासह सुमारे दीडशे मराठी व इंग्रजी पुस्तकांच्या साहाय्याने श्रीमती रमाबाई यांची तुला करण्यात आली. या कल्पक उपक्रमामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते.

तुला पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मोतीचूर लाडूंचीही तुला करण्यात आली. मात्र, कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुला केलेली सर्व पुस्तके उपस्थित पाहुण्यांना आणि आप्तेष्टांना मोफत वितरित करण्यात आली. अशा प्रकारे हा केवळ एक कौतुकास्पद घरगुती सोहळा न राहता ‘ज्ञानदानाचे’ सामाजिक कार्य ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात नातवंडांच्या स्वागत गीताने व नृत्याने झाली. वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेल्या रमाबाईंची तुला करण्यासाठी त्यांचा पणतू गौरांग यावलकर याने पहिले पुस्तक ठेवले, त्यानंतर सर्व कुटुंबीय आणि नातेवाईकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. याप्रसंगी कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

याच सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार राजू कवडीवाले यांचे चिरंजीव आकाश कवडीवाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. थायलंडस्थित ‘युनिलॅम्प लायटिंग’ कंपनीत त्यांची सार्क (SAARC) देशांसाठी प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य श्रीकांत जोशी यांनी केले, तर आभार राजू कवडीवाले यांनी मानले. सायंकाळी सुंदरकांड पठणाने वातावरणात आध्यात्मिक प्रसन्नता पसरली. या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयातील सरकारी वकील  अ‍ॅड. प्रकाश साळशिंगीकर, अ‍ॅड. सुनिता खंडाळे, हितेश गडे, डॉ. एस. के. वाणी, रमाकांत देशपांडे आणि नगरसेवक पराग सराफ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound