मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि शब्दाचे पक्के व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यावर माजी मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी अत्यंत भावूक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे म्हणाले की, “अजितदादा हे केवळ एक नेते नव्हते, तर दिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहणारे ते एकमेव व्यक्तिमत्व होते. राजकारणात अनेक लोक भेटतात, पण दादांसारखा स्पष्टवक्ता आणि शब्दाचा पक्का माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे.”

एकनाथ खडसे यांनी पुढे नमूद केले की, अजितदादांनी आपल्या कार्यकाळात विकासाची जी उंची गाठली, ती प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भविष्यात कधीही भरून काढता येणार नाही. राजकारणातील एक मोठा ‘आधारवड’ कोसळल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दुःखद प्रसंगी खडसे यांनी दादांच्या कार्याला उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



