जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकीय व प्रशासकीय क्षेत्राला धक्का देणाऱ्या घटनेनंतर जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात शासकीय दुखवटा पाळण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील राजशिष्टाचार कक्षामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या वायरलेस संदेशाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच 28 जानेवारी 2026 रोजी सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या यंत्रणांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत. यात ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव व भुसावळ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका, आकाशवाणी केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जिल्हा कारागृह तसेच सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांचा समावेश आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय दुखवट्याच्या कालावधीत सर्व शासकीय इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येतील आणि कोणतेही शासकीय मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. तसेच संबंधित कार्यालयांनी शासनाच्या सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व विभागांनी या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून प्रशासन, राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.



