जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या ‘आशा’ स्वयंसेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा परिषदेसमोर तीव्र धरणे आंदोलन केले. ‘आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक वेल्फेअर युनियन’च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

थकीत मानधनाचा प्रश्न गंभीर:
आंदोलक महिलांच्या प्रमुख तक्रारीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून ‘जननी सुरक्षा योजने’च्या अंतर्गत केलेल्या कामांचा मोबदला प्रशासनाकडून मिळालेला नाही. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी दोन वर्षे वाट पाहावी लागत असल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालय असलेल्या आशा स्वयंसेविकांना ‘आरोग्यवर्धिनी’ कामांचा मोबदला देखील नियमित दिला जावा, अशी मागणी करण्यात आली.

‘जिओ टॅग’च्या जाचक अटीला विरोध:
कामाचा अहवाल सादर करताना सध्या जिओ टॅग फोटो प्रिंट व्हाउचर लावण्याची सक्ती केली जात आहे. ग्रामीण भागात रेंजची समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे हे काम करणे अत्यंत कठीण जात असल्याने, ही पद्धत तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. “आम्ही रात्रंदिवस सेवा देतो, मात्र मोबदल्याच्या वेळी तंत्रज्ञानाचा अडसर आणून आमचे पैसे अडवले जात आहेत,” असा आरोप आंदोलक महिलांनी केला.
या आंदोलनामुळे जिल्हा परिषद परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केले. जर या मागण्या येत्या काही दिवसांत मान्य झाल्या नाहीत, तर काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी युनियनच्या वतीने देण्यात आला.



