जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्हाभरात आज, मंगळवारी २७ जानेवारी रोजी निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. कडाक्याची थंडी अपेक्षित असतानाच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आलेल्या या पावसामुळे जळगावकरांची चांगलीच दाणादाण उडाली.

मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉवर चौक, आकाशवाणी चौक आणि गोलाणी मार्केट परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची आणि दुचाकीस्वारांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या अवकाळी पावसाचा मोठा फटका शहरातील लहान विक्रेत्यांना बसला आहे. रस्त्याकडेला बसणाऱ्या फळविक्रेत्यांचे आणि कापड दुकानदारांचे पावसामुळे किरकोळ नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसाने जळगाव शहरासह लगतच्या नशिराबाद, असोदा आणि परिसरातही चांगलाच जोर धरला होता.
भर हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून, थंडी आणि पाऊस अशा दुहेरी हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खोकला, ताप आणि सर्दीसारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी काही प्रमाणात नुकसानकारक ठरू शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.



