जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील एका दीड वर्षीय चिमुकलीने मेंदूज्वर सारख्या अत्यंत गंभीर आजारावर मात करत मृत्यूला हुलकावणी दिली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या बालिकेचे प्राण वाचवण्यात यश आले असून, ती आता पूर्णपणे बरी होऊन घरी परतली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील दीड वर्षीय मनस्वी पाटील या चिमुकलीला अचानक तीव्र ताप आणि झटके येऊ लागले होते. झटक्यांमुळे तिच्या शरीराची हालचाल मंदावून ती बेशुद्धावस्थेत गेली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालकांनी तिला तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. बालरोग विभाग प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमाकांत अणेकर आणि डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्या टीमने तातडीने तपासणी सुरू केली. पाठीतील पाण्याची तपासणी, सीटी स्कॅन आणि एमआरआय करण्यात आले. या सर्व चाचण्यांअंती चिमुकलीला ‘मेंदूज्वर’ असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर तिला तातडीने बालरोग अतिदक्षता विभागात हलवून २४ तास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. मेंदूतील सूज कमी करणे, ताप नियंत्रण आणि पोषण व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांचे अचूक निदान आणि परिचारिकांच्या अथक परिश्रमांमुळे अवघ्या आठवडाभरात चिमुकलीचे झटके थांबले. तिची शुद्धी परतली आणि प्रतिसादही पूर्ववत झाला. सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक आल्यानंतर तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानताना भावूक प्रतिक्रिया दिली. या यशस्वी उपचारांसाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अभिजीत अरमाळ, डॉ. निरज जगताप, भारती झोपे, हिरामण लांडगे आणि नर्सिंग स्टाफने परिश्रम घेतले.
“मेंदूज्वर हा लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. पालकांनी मुलांमध्ये अचानक तीव्र ताप, झटके किंवा शुद्ध हरपणे अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर मिळालेले उपचारच प्राण वाचवू शकतात.”
डॉ. अभिजीत अरमाळ, निवासी डॉक्टर, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय.



