पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १००व्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पारोळा येथे भावपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले असून, त्यांच्या विचारधारा, कार्य आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला निर्भीड, स्पष्टवक्तेपणा आणि जनहितासाठीचा लढाऊ विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत अविरत पोहोचवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि सामाजिक न्यायासाठी बाळासाहेबांनी उभा केलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या जयंती सोहळ्यास महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सौ. अंजलीताई करण पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, शिवसेना विधानसभा प्रमुख दौलत पाटील, माजी उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, शहरप्रमुख अशोक मराठे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक भुषण टिपरे, इम्रान शेख, सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, मोहम्मद पठाण, लखन वाणी, मोहम्मद खान, राजू बागडे, अनिल अनुष्ठान, रवी अहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत शिवसेनेची मूळ भूमिका आणि जनतेशी असलेली नाळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि एकजुटीचे वातावरण दिसून आले.



