Home राजकीय देशातील जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा

देशातील जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा


नवी दिल्ली-वृत्तसेवा । देशातील बहुप्रतीक्षित जनगणना २०२७ प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात प्रामुख्याने घरयादी आणि गृहगणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला या सहा महिन्यांच्या कालावधीत आपापल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कालावधी निवडून ही मोहीम पूर्ण करावी लागणार आहे.

सरकारने या टप्प्यासाठी ३३ प्रश्नांची अधिकृत प्रश्नावली अधिसूचित केली आहे. या माध्यमातून घरांची स्थिती, कुटुंबाची माहिती आणि मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.या मोहिमेसाठी नियुक्त केलेले प्रगणक प्रत्यक्ष घराघरात भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. यामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल:

घराचे स्वरूप व मालकी – घर स्वतःचे आहे की भाड्याचे, घराचा वापर कशासाठी होतो, छप्पर व मजल्यासाठी कोणते साहित्य वापरले आहे, याची नोंद घेतली जाईल.

कुटुंबाची माहिती – कुटुंबातील एकूण सदस्यसंख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची सामाजिक प्रवर्ग (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याबाबत माहिती घेतली जाईल.

मूलभूत सुविधा – पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, विजेची उपलब्धता, सांडपाणी निचरा व्यवस्था, घरात शौचालय आहे की नाही, तसेच स्वयंपाकासाठी एलपीजी (LPG) किंवा पीएनजी (PNG) जोडणी आहे का, याची नोंद केली जाईल.

यावेळी नागरिकांच्या आधुनिक जीवनशैलीचाही आढावा घेतला जाणार आहे. घरात रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन, स्मार्टफोन यांसारखी उपकरणे आहेत का, याबाबत माहिती विचारली जाईल. तसेच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात मुख्यत्वे कोणते धान्य वापरले जाते, हे देखील नोंदवले जाईल.

जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांक देखील घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, प्रगणक घरी येण्यापूर्वी नागरिकांना १५ दिवस आधी ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिक ऑनलाईन पोर्टलवर जाऊन स्वतःच आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे. प्रगणक कागदी फॉर्मऐवजी मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित करणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. या टप्प्यात नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक बाबींविषयी अधिक तपशीलवार माहिती घेतली जाणार आहे.

दरम्यान, यावेळच्या जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद व्हावी, अशी राजकीय स्तरावर मागणी जोर धरत असली तरी याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.


Protected Content

Play sound