Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ; महिलेच्या पोटातून तब्बल एक किलो मांसाचा गोळा...

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ; महिलेच्या पोटातून तब्बल एक किलो मांसाचा गोळा काढण्यात यश


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नांदुरा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मांसाचा गोळा काढण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांनी वेळेवर आणि अचूक शस्त्रक्रिया करत या महिलेचे प्राण वाचवले असून, ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

सदर महिलेला काही काळापासून सतत पोटदुखीचा त्रास होत होता. यासोबतच तिची मासिक पाळी अनियमित झाली होती आणि कधी कधी अंगावरूनही जात होती. प्रारंभी या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्याने प्रकृती अधिक बिघडत गेली. अखेर कुटुंबीयांनी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता, पुढील उपचारांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

त्यानुसार हुसेना बी. (नाव बदलले आहे) यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे स्त्रीरोग विभागातील डॉ. प्रिया राठोड आणि डॉ. वैभव पाटील यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. विविध वैद्यकीय चाचण्या व सोनोग्राफी केल्यानंतर रुग्णाच्या पोटात मोठ्या प्रमाणात मांसाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.

विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. रश्मी संघवी आणि डॉ. पल्लवी यांच्या अनुभवी पथकाने ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मांसाचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून ती सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

या यशस्वी उपचाराबाबत माहिती देताना निवासी डॉक्टर डॉ. ऐश्वर्या चलवदे यांनी सांगितले की, ठरावीक वयानंतर महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होत असतात. मासिक पाळीतील अनियमितता, सततची पोटदुखी याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळेवर योग्य निदान व उपचार मिळाल्यास अशा रुग्णांचा जीव निश्चितपणे वाचवता येतो.


Protected Content

Play sound