Home Cities जळगाव जैव-खत कंपनीवर आयकर विभागाचा टीडीएस सर्वे; ₹1.02 कोटींची थकबाकी उघड

जैव-खत कंपनीवर आयकर विभागाचा टीडीएस सर्वे; ₹1.02 कोटींची थकबाकी उघड


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक व जळगाव येथील आयकर विभागाच्या टीडीएस पथकांनी संयुक्त कारवाई करत जळगाव शहरातील जैव-खते, सूक्ष्म पोषक घटक, जैव-उत्तेजक द्रव्ये आणि कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी सर्वेक्षण केले. संयुक्त आयकर आयुक्त (टीडीएस), नाशिक रेंज यांच्या मार्गदर्शनाखाली आयकर कायदा 1961 च्या कलम 133A (2A) अंतर्गत ही कारवाई पार पडली.

सर्वेक्षणादरम्यान दिवसभर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासात चालू आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये कंपनीने केलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये लागू असलेला टीडीएस/टीसीएस नियमानुसार कापून केंद्र सरकारच्या खात्यात जमा न केल्याचे निदर्शनास आले.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर वजावट करणाऱ्याकडून एकूण ₹1 कोटी 2 लाखांची टीडीएस थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने ₹50 लाखांहून अधिक रक्कम केंद्र सरकारच्या खात्यात जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम लवकरच भरण्याचे आश्वासन कंपनीच्या संचालकांनी दिले आहे.

आयकर विभागाने स्पष्ट केले की, एकदा टीडीएस कापल्यानंतर तो “सरकारी पैसा” ठरतो आणि त्याचा गैरवापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. कंपन्या, ट्रस्ट आणि सोसायट्यांनी फॉर्म 26AS व AIS यांची नियमित जुळवणी करणे, वेळेत टीडीएस/टीसीएस जमा करणे तसेच विभागीय सूचनांना तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

तांत्रिक चुकांच्या नावाखाली वारंवार थकबाकी ठेवणाऱ्यांना यापुढे सूट दिली जाणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. जाणूनबुजून थकबाकी ठेवल्यास व्याज, मोठा दंड तसेच आयकर कायदा 1961 अंतर्गत खटल्यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. हा कडकपणा प्रामाणिक करदात्यांसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, आयकर विभागाने सर्व संबंधितांना टीडीएस/टीसीएसच्या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आणि वेळेवर कर कपात व जमा करण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound