मुंबई-वृत्तसेवा । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असून, या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त झाली आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की दावोस दौरा अत्यंत यशस्वी ठरला असून, आतापर्यंत जवळपास ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ही गुंतवणूक केवळ कागदावर मर्यादित नसून प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया पुढील ३ ते ७ वर्षांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या गुंतवणुकीत उद्योग, सेवा तसेच कृषी क्षेत्राचा समावेश असून सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. एकूण गुंतवणूक करारांपैकी ८३ टक्के थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आहे. उर्वरित १६ टक्के गुंतवणूक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था किंवा तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून होत असून, यात एफडीआय कमी असली तरी अत्याधुनिक परदेशी तंत्रज्ञानाचा लाभ राज्याला मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की एकूण १८ देशांतून महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे. यामध्ये अमेरिका, यूके, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड्स, जपान, इटली, यूएई, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम आणि ऑस्ट्रिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे कामगिरी उत्कृष्ट राहिली असून, राज्याने गुंतवणूक आकर्षित करण्यात आघाडी घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक झाली याविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की क्वांटम कम्प्युटिंग, एआय डेटा सेंटर, एआय तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये मोठ्या कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे आल्या आहेत. यासोबतच फूड प्रोसेसिंग, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन स्टील, ई-व्ही, शहरी रूपांतरण, शिप बिल्डिंग, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक्स, टेक्सटाईल आणि डिजिटल क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये ही गुंतवणूक विभागली गेली असून, विदर्भात सुमारे १३ टक्के गुंतवणूक झाली आहे. नागपूर विभागासह संपूर्ण विदर्भात जवळपास २ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हे नवीन गुंतवणूक मॅगनेट म्हणून पुढे येत असून, येथे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आली आहे. याशिवाय पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशातही भरीव गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
या गुंतवणुकीमुळे राज्यातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल आणि महाराष्ट्राची देशातील तसेच जागतिक पातळीवरील आर्थिक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



