सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणा, मेहनत आणि नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री आ. गं. हायस्कूल व श्री ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथे कॉपीमुक्त अभियान (गैरमार्गाशी लढा) या संदर्भातील विशेष सभा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेतील गैरमार्ग टाळून कष्टाच्या जोरावर यश मिळवण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सावदा नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ. रेणुका राजेंद्र पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच शिक्षण समिती सदस्य कुमारी सिमरन राजेश वानखेडे, नकुल नितीन बेंडाळे, फिरोज खान अब्दारखा, गणेश भागवत सोनवणे, सौ. प्रतिक्षा मनिष भंगाळे, सौ. विजया कुशल जावळे, सौ. सुनीता संजय तायडे, सलीम पिंजारी, सुभाष सुपडू तेली, संजय मधुकर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. जी. भालेराव यांनी करताना कॉपीमुक्त अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर संजय मोतीराम महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची सविस्तर माहिती देत गैरमार्गामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच आभार प्रदर्शन केले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत रिसीट कशी तपासावी याबाबत अतुल सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कुमारी सिमरन वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, अभ्यासासोबतच अंगी असलेल्या कला व इतर गुणांमध्येही प्रगती साधता येते आणि त्यातूनही यशाच्या शिखरावर पोहोचता येते, असे प्रतिपादन केले. सौ. प्रतिक्षा मनिष भंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून एकाग्रतेने प्रयत्न केल्यासच यश मिळते, असे ठाम मत व्यक्त केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट शब्दांत संदेश दिला की, कठोर परिश्रमाशिवाय यशाला पर्याय नाही. कॉपीच्या माध्यमातून मिळालेले यश टिकाऊ नसते आणि अशा मार्गाने आयुष्यात पुढे जाता येत नाही. अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्ष सौ. रेणुका राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडील, शाळा, गाव आणि राष्ट्राचा विचार करून प्रामाणिक मेहनतीने यश संपादन करावे, असे आवाहन केले. परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत; मात्र यशासाठी वाम मार्गाचा अवलंब करू नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सर्व वक्त्यांचे विचार अत्यंत एकाग्रतेने ऐकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाध्यापक नंदू पाटील सर यांनी केले. एकूणच ही सभा विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, आत्मविश्वास आणि प्रामाणिक परिश्रमांची जाणीव निर्माण करणारी ठरली.



