Home Cities एरंडोल ‘ऑपरेशन मुस्कान’ला मोठे यश! कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता मुलगी

‘ऑपरेशन मुस्कान’ला मोठे यश! कासोदा पोलिसांनी २४ तासांत शोधली बेपत्ता मुलगी


एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेला मोठे यश मिळाले असून, कासोदा पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेल्या एका १५ वर्षीय मुलीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत शोध लावला आहे. रागाच्या भरात घर सोडून गेलेल्या या बालिकेला पायी दिंडीतून शोधून काढत पोलिसांनी तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

सविस्तर वृत्त असे की, कासोदा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक १५ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांना काहीही न सांगता रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून कासोदा पोलिसांनी तातडीने तपास चक्रावली. प्रभारी अधिकाऱ्यांनी मुलीच्या गावापासून ते मुख्य महामार्गापर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि सर्व नजीकच्या पोलीस ठाण्यांना मुलीच्या वर्णनानुसार सूचना दिल्या.

तपासादरम्यान, चाळीसगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पायी दिंडीमध्ये सदर वर्णनाची मुलगी असल्याचे दिसून आले. कासोदा पोलीस पथकातील सपोनि श्रीकांत पाटील, पोउनि धर्मराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने चाळीसगाव गाठले आणि खात्री करून मुलीला ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, तेव्हा पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

ही मोहीम जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आली. या कामगिरीबद्दल कासोदा पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound