जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ‘ओबीसी महिला’ संवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षातून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, आमदार राजूमामा भोळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “महापौर पदासाठी पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत उमेदवारालाच संधी दिली जाईल,” असे महत्त्वपूर्ण वक्तव्य त्यांनी केले आहे. गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार भोळे म्हणाले की, “कोणत्याही संवर्गाचे आरक्षण निघाले असते तरी भारतीय जनता पक्षाकडे सर्व संवर्गातील सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. सध्या जाहीर झालेल्या ओबीसी महिला आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो. आमच्याकडे या प्रवर्गातील ८ ते ९ अनुभवी महिला नगरसेविका आहेत, त्यामुळे निवडीसाठी आमच्याकडे प्रबळ पर्याय उपलब्ध आहेत.” महापौर निवडीच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, अंतिम उमेदवाराचे नाव पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कोअर कमिटीच्या माध्यमातून निश्चित केले जाईल. अडीच वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त सदस्यांना कामाची संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न राहील. आरक्षणापेक्षा शहराचा सर्वांगीण विकास करणे हे आमचे मुख्य ध्येय असून, नवनिर्वाचित महापौर त्याच दृष्टीने कार्यरत राहतील. आमदारांच्या या ‘ज्येष्ठ आणि निष्ठावंत’ या शब्दांमुळे आता भाजपमधील इच्छुक महिला नगरसेविकांमध्ये कोणाचे नाव आघाडीवर येते, याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.




