मुंबई-वृत्तसेवा । महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूक निकालांनंतर बहुप्रतिक्षित महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारी नगरविकास मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर झाली. ५० टक्के महिला आरक्षण धोरणानुसार यंदा २९ पैकी १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर असतील. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही प्रमुख शहरांमध्ये महिलांसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. परिणामी या शहरांचे नेतृत्व आता महिलांच्या हाती जाणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख शहरांच्या विकासाची सूत्रे महिला महापौरांकडे असतील, असा स्पष्ट संदेश या आरक्षणातून मिळतो.

या आरक्षणानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, धुळे, मीरा-भाईंदर, मालेगाव आणि सोलापूर येथे महिला (खुले) प्रवर्गातून महापौर असतील. अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर येथे ओबीसी महिला, तर लातूर आणि जालना येथे अनुसूचित जाती महिला महापौर असतील.
उर्वरित १४ महानगरपालिकांमध्ये महापौरपद पुरुष अथवा खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अमरावती, परभणी, सांगली–मिरज–कुपवाड आणि पिंपरी–चिंचवड येथे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून महापौर निवड होणार आहे. उल्हासनगर, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव असून, ठाणे येथे अनुसूचित जाती तर कल्याण–डोंबिवली येथे अनुसूचित जमातीसाठी महापौरपद खुल्या प्रवर्गातून देण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि मालेगाव या चारही प्रमुख शहरांमध्ये महिलांचे वर्चस्व राहणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर, अकोला आणि चंद्रपूरमध्येही महिला महापौर असतील, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौरपदाची निवड होणार आहे.
निवडणूक निकालांनंतर आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक महानगरपालिकांतील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. वर्षानुवर्षे महापौरपदाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या अनुभवी पुरुष नेत्यांसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये पक्षांतर्गत सक्षम आणि प्रभावी महिला नेत्यांचा शोध सुरू झाला असून, या आरक्षणामुळे राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र आहे.



