जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील मदनी नगर परिसरातील एका भागातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १० वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका नराधमाविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, पीडित बालक (वय १० वर्षे) हा २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरातून दळण आणण्यासाठी गेला होता. यावेळी मदनी नगरमधील आरोपी साद खान जहीर खान (वय २५) याने बालकाच्या अजाणतेपणाचा फायदा घेतला. त्याने मुलाला जवळ बोलावून अश्लील कृत्य केले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित मुलाला आणि त्याच्या चुलत्याला जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली.

या घटनेनंतर पीडित मुलाने घरी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलाचे चुलते शेख इरफान शेख खालीद यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी साद खान हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.



