सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून तब्बल १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची चर्चा असताना, प्रत्यक्ष काम पाहता या निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्यंत जुनी व शासनाच्या मालकीची असलेली ही इमारत आजही अर्धवट नूतनीकरणाच्या अवस्थेत असून, नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत आहे.

कार्यालयाबाहेरील शेड, आतील फरशी, रंगरंगोटी व फर्निचर काही प्रमाणात नवीन करण्यात आले असले तरी संपूर्ण काम अपूर्ण असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विशेष म्हणजे दररोज खरेदी-विक्री व दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना तासन्तास उभे राहून काम उरकावे लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व शारीरिकदृष्ट्या अशक्त व्यक्तींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आता उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असताना कार्यालयात कुलर असला तरी पिण्याच्या पाण्याची सोय नसणे ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे. सार्वजनिक कार्यालयात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या किमान सुविधा उपलब्ध नसताना, एवढा मोठा निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नूतनीकरणाच्या नावाखाली केवळ दिखाऊ काम झाले असून प्रत्यक्षात गरजेच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात नूतनीकरणाच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी तसेच खर्चाचा सविस्तर हिशोब सार्वजनिक करावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



