Home राजकीय आरक्षण सोडतीनंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग; बीएमसीचा महापौर कोण?

आरक्षण सोडतीनंतर मुंबईत राजकीय हालचालींना वेग; बीएमसीचा महापौर कोण?


मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली असून यंदा अनेक महापालिकांमध्ये महिला नेतृत्व पुढे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2026) महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला गटाला आरक्षण देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महायुतीकडूनच महापौर निवडला जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, मुंबईचा महापौर मराठी की अमराठी, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तसेच महायुतीतील कोणत्या महिला नेत्या ही जबाबदारी सांभाळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

महापौर पदासाठी चर्चेत असलेल्या महिला नगरसेविकांमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. दहिसर येथील वॉर्ड क्रमांक २ मधून त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून, त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत दाखल झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी विजय मिळवला असून, भाजपकडील सक्षम आणि अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे.

याशिवाय मालाडमधून भाजपच्या तिकीटावर मोठ्या मताधिक्याने विजयी ठरलेल्या योगिता सुनील कोळी यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे आणि शीतल गंभीर या महिला नेत्यांची नावेही चर्चेत आहेत.

यंदा मुंबई महापालिकेत एकूण १३० महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यापैकी भाजपकडे ८९ पैकी ४९ महिला नगरसेविका, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ६५ पैकी ३८ महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार, हे निश्चित असले तरी भाजप नेमकी कोणत्या महिला नेत्या संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound