सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा कृषी मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिकविमा परताव्याची प्रतीक्षा अखेर आंदोलनाच्या टोकाला जाऊन पोहोचली आहे. २०२४–२०२५ या कालावधीतील केळी पिकविम्याची नुकसानभरपाई अद्याप बँक खात्यात जमा न झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष पसरला असून प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जानेवारी महिना संपत आला तरी विमा परतावा न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जफेड, शेतीतील पुढील कामकाज आणि घरखर्च या सर्व आघाड्यांवर अडचणी वाढत चालल्या असून शासन आणि विमा कंपनीकडून केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सावदा, थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे-सुदगाव, रायपूर, गहूखेडे, रणगाव, तासखेडा, उधळी बुद्रुक, उधळी खुर्द, लूमखेडा आदी गावांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी, तहसील प्रशासन तसेच पिकविमा कंपनीच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधला. मात्र, अनेक बैठका व निवेदनांनंतरही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
या प्रश्नाबाबत माजी मंत्री तथा विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय राज्यमंत्री व खासदार रक्षाताई खडसे, आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, उपविभागीय अधिकारी फैजपूर तसेच पिकविमा कंपनीकडे लेखी निवेदने देण्यात आली. तरीही विमा परताव्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार केला आहे.
दि. २३ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी सकाळी १०.३० वाजता सावदा–रावेर रस्त्यावरील भारतेश्वर मंदिराजवळ सावदा मंडळातील सर्व केळी पिकविमा धारक शेतकरी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनापूर्वीच विमा परतावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यास आंदोलन रद्द करण्यात येईल, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले आहे.
या आंदोलनाची पूर्वसूचना केंद्रीय राज्यमंत्री व खासदार, जिल्हाधिकारी जळगाव तसेच उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. आंदोलनासाठी राजेंद्र गजमल पाटील, ललित अशोक पाटील, भरत रविंद्र झांबरे, जयवंत प्रभाकर चौधरी, अक्षय होमराज महाजन, सुमित वसंत पाटील, शशांक मुकेश पाटील, योगेश सुभाष महाजन, राहुल विजय पाटील व दिलीप मधुकर पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत.



