Home राजकीय मुंबईचा महापौर कोण? ‘नॉट रिचेबल’ नगरसेविका परतल्या; ठाकरे गटाचा मोठा दावा

मुंबईचा महापौर कोण? ‘नॉट रिचेबल’ नगरसेविका परतल्या; ठाकरे गटाचा मोठा दावा


मुंबई, वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सत्तेच्या समीकरणांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील एक नवनिर्वाचित नगरसेविका अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता त्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगून ठाकरे गटाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नेमका प्रकार काय?

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र येत ‘ब्रँड’चा करिश्मा दाखवत ७२ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीने (भाजप-शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवकांची पळवापळवी होऊ नये म्हणून शिंदे गटाने आपले सर्व नगरसेवक सुरक्षिततेसाठी हॉटेलमध्ये हलवले आहेत.

अशातच, ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू झाली. कोकण भवनात ठाकरे गटाच्या नगरसेवकांची अधिकृत नोंदणी प्रक्रिया सुरू असताना म्हस्के तिथे गैरहजर राहिल्या आणि त्यांचा फोनही बंद असल्याचे समोर आले. यामुळे ठाकरे गटात फूट पडणार का? अशी चर्चा रंगली होती.

अनिल परब यांचे स्पष्टीकरण
या नाट्यावर अखेर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पडदा टाकला. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, डॉ. सरिता म्हस्के या पक्षाच्या संपर्कात असून कुठेही गेलेल्या नाहीत. “सरिता म्हस्के या आमच्या संपर्कात आहेत. त्या कोकण भवनात दाखल होतील. बैठकीला उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी त्या पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी न येण्याचे जे कारण आम्हाला दिले आहे, ते आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, परंतु ते खासगी असल्याने माध्यमांना सांगू शकत नाही,” असे परब म्हणाले.


Protected Content

Play sound