Home क्राईम सावधान !; मृताच्या नावे बनावट ‘गेलाराम’ उभा करून हडपली ११ लाखांची जमीन

सावधान !; मृताच्या नावे बनावट ‘गेलाराम’ उभा करून हडपली ११ लाखांची जमीन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून आणि तो व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून सुमारे ३ हेक्टर १९ आर शेतजमिनीची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार यावलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी जालन्याच्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ, नवी मुंबई, वसई आणि यावल येथील एकूण १२ जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कांचन संजय खत्री (वय ५२, रा. जालना) यांचे काका गेलाराम भुरोमल यांच्या नावे यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथे गट क्र. १९३ मध्ये मोठी शेतजमीन होती. गेलाराम यांचा मृत्यू १ जानेवारी १९९५ रोजी झाला होता. मात्र, आरोपी अजित तुळशीराम भंडारी (अंबरनाथ) याने मृत गेलाराम यांच्या जागी श्याम मनोहर मुंदडा (वसई) याला बनावट ‘गेलाराम’ म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. त्यांचे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड तयार करून ही जमीन ११ लाख १५ हजार रुपयांत लाटली.

या घोटाळ्यात आरोपींनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या व्यवहार केले. बनावट खरेदीखताच्या आधारे सदर जमिनीचे दोन तुकडे करून १ हेक्टर ४५ आर जमीन आरोपी सकूबाई धनगर हिच्या नावे, तर उर्वरित १ हेक्टर ७४ आर जमीन प्रशांत पाटील याने स्वतःच्या नावावर करून घेतली. या प्रक्रियेत नवी मुंबई आणि विरार येथील आरोपींनी खोटे साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या, तर स्थानिक आरोपींनी जमीन मालकाची खात्री न करता या गुन्ह्यात संगनमत केले.

याप्रकरणी पोलिसांनी अजित तुळशीराम भंडारी रा. ठाणे, श्याम मनोही मुंदडा रा. पालघर, सचिन हेमचंद राऊत रा. नवी मुंबई, उमेश चंद्रकांत कदम वय ४१, सकूबाई दशरथ धनगर, शांताराम दशरथ धनगर, रवींद्र दशरथ धनगर, ईश्वर यशवंत पाटील, दिलीप लक्ष्मण धनगर सर्व रा. बोरावल खुर्द ता. यावल, किशोर सुरेश माळी आणि शेख युसूफ शेख फारुख राहणार यावल अशा १२ जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.


Protected Content

Play sound