पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, राज्यात शेतकरी स्तरावर सुरू असलेली रब्बी हंगाम 2025 ची पीक पाहणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही पीक पाहणी दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून, तिचा अंतिम दिनांक 24 जानेवारी 2026 असा निश्चित करण्यात आला आहे.

शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी अत्यंत आवश्यक मानली जाते. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी मदत, शासकीय धान्य खरेदी तसेच इतर कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणीची नोंद अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक माहिती वेळेत नोंदवणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या पीक पाहणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असून, अद्याप ज्यांची पीक पाहणी बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत पीक पाहणी न केल्यास भविष्यात शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असेही सांगण्यात आले आहे.
त्यामुळे पारोळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी उर्वरित कालावधीचा योग्य वापर करून आजच आपली रब्बी हंगाम 2025 ची पीक पाहणी पूर्ण करावी व आपला हक्क सुनिश्चित करावा, असे आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले आहे.



