पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील वंचित घटकांच्या आरोग्य व कल्याणासाठी केलेले उपक्रम खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारे ठरतात. अशाच भावनेतून पारोळा शहरातील कॉटेज हॉस्पिटलमधील कर्मचारी तसेच खान्देशी रक्षक संस्थेचे पारोळा तालुका सपोर्टर अध्यक्ष दीपक सोनार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवला.

१९ जानेवारी रोजी अमळनेर रोडवरील मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेत दीपक सोनार यांच्या पुढाकाराने प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन देण्यात आले, तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली औषधे मोफत वितरित करण्यात आली.

या वेळी विद्यार्थ्यांसाठी कफ सिरप, ड्रेसिंग साहित्य तसेच ताप, थंडी आणि खोकल्यावरील आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे दीपक सोनार यांनी सांगितले.
या सामाजिक कार्यक्रमास नगरसेवक पंकज मराठे, कॉटेज हॉस्पिटलचे डॉ. गिरीश जोशी, विशाल महाजन, सामाजिक क्षेत्रातील अमोल मराठे, रिंकू शेलार, भैय्या शेलार, दर्शन पाटील, सागर बधान, पप्पू चौधरी, दीपक पाटील, भूषण पाटील, गौरव अहिरे, राहुल पवार, दीपक वाघ, राहुल भावसार, सागर मराठे यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी दीपक सोनार यांच्या या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले. मतिमंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचे खरे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



