Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपालिकेच्या स्थायी समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व ; सभापतीपद नगराध्यक्ष सौ. छाया...

यावल नगरपालिकेच्या स्थायी समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व ; सभापतीपद नगराध्यक्ष सौ. छाया पाटील यांच्याकडे


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या असून, नगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. या निवड प्रक्रियेमुळे नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीतील एकूण सहा सदस्यांपैकी चार सदस्य हे महाविकास आघाडीचे असल्याने निर्णयप्रक्रियेत आघाडीचे वजन अधिक राहणार आहे. यामुळे आगामी काळात नगरपालिकेच्या विकासकामांवर आणि आर्थिक निर्णयांवर महाविकास आघाडीचा प्रभाव राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

नगरपालिकेच्या दुसऱ्या पदसिद्ध उपनगराध्यक्ष सईदा बी. शेख याकुब यांच्याकडे स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीचा पदभार सोपविण्यात आला आहे. शहराच्या आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार असल्याने नागरिकांच्या दृष्टीने या नियुक्तीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

यावल नगरपालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रियेनुसार शांततेत ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या निवडीनंतर नवनियुक्त सभापतींचे स्वागत स्वीकारलेले नगरसेवक तसेच महाविकास आघाडीचे नेते अतुल वसंत पाटील यांनी केले. त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थायी समिती व इतर विषय समित्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound