Home क्राईम मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, सराईत चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका सराईत आरोपीस अटक करून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरात घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठा आघात बसला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग विजयकुमार ठाकुरवाड यांनी मोटारसायकल चोरीसारखे गुन्हे उघडकीस आणून त्यांना प्रतिबंध घालण्याबाबत मेहुणबारे पोलिसांना स्पष्ट मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी व पथकाने तपासाची दिशा ठरवत कारवाई केली.

दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगाव व वरखेड या गावांत दिवसा दोन मोटारसायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत संबंधित फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ०७/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमूद गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत गुन्ह्यातील तीन आरोपी निष्पन्न केले.

तपासादरम्यान आरोपी दादू संजय सोनवणे (वय १९ वर्षे, रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यास मालेगाव येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली एक मोटारसायकल तसेच अन्य एका गुन्ह्यातील अशी एकूण दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा सराईत मोटारसायकल चोर असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्या अटकेनंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण अ. दातरे , पोलीस उपनिरीक्षक  सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ. मोहन सोनवणे, गोकुळ सोनवणे, पोना. मिलिंद कुमावत, पोको. विनोद बेलदार, राकेश काळे व प्रशांत खैरे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत.


Protected Content

Play sound