जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) देवगिरी प्रदेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी नव्या नेतृत्वाची घोषणा करण्यात आली असून प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे यांची देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून तर जळगावचे डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे यांची प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली.
नव्या नेतृत्वाचा कार्यकाळ एक वर्षाचा असून दोन्ही पदाधिकारी दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हिंगोली येथे होणाऱ्या अभाविपच्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात आपली जबाबदारी स्वीकारणार आहेत. या निवडीमुळे देवगिरी प्रदेशातील विद्यार्थी चळवळीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे हे मूळचे गंगाखेड, जिल्हा परभणी येथील असून त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपला ठसा उमटवला असून रशिया व मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांच्या निमित्ताने त्यांनी विदेश यात्रा केली आहे.
शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात प्रा. डॉ. मुंढे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून हिंदी साहित्यातील तब्बल १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे ५५ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळ सक्षम करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग व उपक्रमांमध्ये त्यांना विशेष रुची आहे.
विद्यार्थी परिषदेच्या कार्यात ते २००१ पासून सक्रिय असून यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगर अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या व्यापक अनुभवामुळे देवगिरी प्रदेशातील विद्यार्थी संघटनात्मक कार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या त्यांचा निवास छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
नूतन प्रदेश मंत्री म्हणून निवड झालेले डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे हे मूळचे जळगाव येथील असून २०१८ पासून अभाविपच्या कार्यात सक्रिय आहेत. सध्या ते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. विद्यार्थी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने संघर्ष करत नेतृत्व केले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वसतिगृह शुल्कवाढ, परीक्षा व मूल्यमापनातील अनियमिततेविरोधातील आंदोलनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
यासोबतच पश्चिम बंगालमधील संदेशखाली व आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील बदलांमुळे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर घाला घालणाऱ्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनातही त्यांनी सक्रिय नेतृत्व केले. शैक्षणिक वर्ष २०२३–२४ व २०२४–२५ मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये अभाविपच्या विजयात त्यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.
देवगिरी प्रदेशातील ग्रामीण, आदिवासी व शहरी सेवावस्ती भागांमध्ये विविध आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजभान व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली यांच्या अंतर्गत ‘ग्रामीण भागातील महिलांमध्ये लोहमात्रा कमतरता व ॲनिमिया’ या विषयावरील संशोधन प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यापूर्वी जळगाव महानगर मेडीव्हिजन सहसंयोजक, मेडीव्हिजन देवगिरी प्रदेश सहसंयोजक, मेडीव्हिजन राष्ट्रीय समिती सदस्य तसेच देवगिरी प्रदेश सहमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. सध्या त्यांचा निवास जळगाव येथे आहे.



