जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या नामांकित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ या शोरूममध्ये धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हासंदर्भात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० ते ५:२५ च्या सुमारास घडली. शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ असताना एका अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, कोणाचीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने २२ कॅरेट शुद्धतेची सोन्याची चैन चोरून नेली. ही बाब लक्षात येताच शोरूममध्ये मोठी खळबळ उडाली. शोरूमचे मॅनेजर गणेश राजाराम काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी याप्रकरणी १९ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी एम. कमलाकर यांनी शोरूमला भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बोरसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. शोरूममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून, जळगाव पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.



