जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात एका भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली असून, संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पिंप्राळा आणि रामानंदनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना पिंप्राळा भागात एका ठिकाणी छुप्या पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांचा गैरफायदा घेत असल्याचे या माहितीवरून समोर आले. गणापुरे यांनी रामानंदनगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि सोमवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संबंधित घरावर धाड टाकली.

पीडितांची सुटका आणि साहित्य जप्त :
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी देहविक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने तत्परता दाखवत ४ पीडित महिलांची तिथून सुटका केली. तसेच या व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
या पथकाने केली कारवाई :
या यशस्वी कारवाईमध्ये विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह कर्मचारी आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतन हरी गिते, रवींद्र मोतीराया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.



