
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।: राजकारणाच्या रणांगणात आव्हाने केवळ समोरच्या विरोधकांकडूनच येतात असे नाही, तर अनेकदा स्वकीयांकडून होणारी कुरघोडी अधिक तीव्र आणि निर्णायक ठरते. जळगाव महापालिका निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे यांनी हेच वास्तव ठळकपणे अधोरेखित केले. विरोधकांना पराभूत करण्याबरोबरच भाजपमधील अंतर्गत गटबाजी, सुप्त संघर्ष आणि राजकीय चक्रव्यूह यांनाही त्यांनी प्रभावीपणे निष्प्रभ केले. ४६ पैकी ४६ जागांवर निर्विवाद विजय मिळवत, जळगाव शहरावर आपली पकड किती भक्कम आहे हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले.

निवडणूक काळात जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ना. गिरीश महाजन हे नाशिकमधील जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले होते. निवडणुकीचे सूत्रे ज्यांच्याकडे सोपवण्यात आली होती, त्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा प्रभाव काही मर्यादित भागापुरताच जाणवला. या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच असलेल्या अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत आपल्याच गोटातून अपेक्षित पाठबळ मिळेल की नाही, अशी शंका असताना राजूमामा भोळे यांनी थेट जनतेशी संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला. वैयक्तिक जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि मतदारांच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडत त्यांनी कोणत्याही अंतर्गत अडथळ्यांना न जुमानता विजय खेचून आणला.
२०१४ साली आर्थिक अडचणींच्या कडेलोटावर उभ्या असलेल्या जळगाव महापालिकेला सावरण्याचे श्रेय आमदार भोळे यांनाच जाते. विरोधकांनी टीका केली असली तरी महापालिकेची कर्जमुक्ती, दोन उड्डाणपुलांचे काम, समांतर रस्त्यांची उभारणी अशा ठोस कामांची आठवण मतदारांच्या मनात ठसलेली होती. केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात उतरवण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली. यामुळेच त्यांच्या कार्यशैलीची दखल घेणे अंतर्गत विरोधकांनाही अपरिहार्य ठरले.
राजूमामा भोळे यांच्या विजयामागील सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांचा अखंड लोकसंपर्क. सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून रात्री उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी नागरिकांचा राबता असतो. काम छोटं असो वा मोठं, कोणीही निराश होऊन परत जाऊ नये, ही त्यांची भूमिका आहे. हीच सातत्यपूर्ण उपलब्धता त्यांना केवळ प्रतिनिधी न ठेवता लोकांचा आपला माणूस बनवते. “शहरातील प्रत्येक घराशी माझं नातं आहे,” हा त्यांचा विश्वास ४६-० च्या निकालातून प्रकर्षाने दिसून आला.
या ऐतिहासिक विजयानंतर जळगाव भाजपमध्ये आमदार राजूमामा भोळे यांचे राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यांच्या नेतृत्वावर शंका घेणाऱ्यांना मतदारांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिले. जाती-पातीच्या चौकटीपलीकडे जाऊन सर्वसमावेशक विकासाचा मार्ग त्यांनी स्वीकारला असून, जळगाव आता नव्या विकास टप्प्याकडे वाटचाल करत आहे. शंभर टक्के यशाचा हा करिश्मा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.



