Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विषय समित्यांची स्थापना ; विशेष सभेत सभापतींची निवड जाहीर

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या विषय समित्यांची स्थापना ; विशेष सभेत सभापतींची निवड जाहीर


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रशासनिक कामकाजाला अधिक सुसूत्रता आणि गती मिळावी, या उद्देशाने आज नगरपंचायत सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा विषय समिती निवडणूक नियम १९६६ मधील नियम ३ नुसार विविध विषय समित्यांची रीतसर स्थापना करण्यात आली असून, सर्व समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर करण्यात आली आहे.

आज सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध लोकनियुक्त नगराध्यक्षा संजना चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. नगरपंचायतीच्या महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत स्थायी समितीची भूमिका निर्णायक असते, त्यामुळे या निवडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. याच सभेत बांधकाम समितीच्या सभापतीपदी ताहेराबी लुकमान शेख यांची निवड करण्यात आली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्षा देवयानी निलेश शिरसाठ यांची निवड झाली असून, या समितीमार्फत महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सविता सुभाष भलभले यांची निवड करण्यात आली आहे, तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रिती राजरत्न वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी हाशम शाह कासम शाह यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवडी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य पाहणारे मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. या वेळी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवनिर्वाचित सर्व समित्यांचे सभापती आणि सदस्य यांचे आमदार चंद्रकांत पाटील, त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, स्वीकृत नगरसेवक छोटू भोई व नितीन जैन, अल्पसंख्यांक आघाडी कार्याध्यक्ष अफसर खान, पियुष मोरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. आगामी कार्यकाळात नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

एकंदरीत, विषय समित्यांच्या स्थापनेमुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रशासनाला दिशा मिळाली असून, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख कामकाजाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound