Home क्राईम डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी; लंडनला जाण्यापासून रोखले 

डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी; लंडनला जाण्यापासून रोखले 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा।  भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले आणि मूळचे जळगावचे डॉक्टर संग्राम पाटील यांना आज पुन्हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीमुळे त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटले असून, वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहे.

डॉ. संग्राम पाटील हे सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक असून ते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि सोशल मीडियावरील राजकीय मतांसाठी ओळखले जातात. 10 जानेवारी रोजी ते कुटुंबासह भारतात आले असता, मुंबई विमानतळावर त्यांना दिवसभर चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात आले होते. त्या दिवशी सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला होता.

या पार्श्वभूमीवर आज 19 जानेवारी रोजी डॉ. संग्राम पाटील हे आपल्या कुटुंबासह लंडनला परतण्यासाठी निघाले होते. त्यांनी सकाळी 8 वाजता इंडिगोच्या विमानाने ब्रिटनला जाणार असल्याची पूर्वकल्पना तपास यंत्रणांना दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्यांच्या विरोधातील लूकआउट सर्क्युलर मागे घेण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.

मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना थांबवण्यात आले आणि विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आला. चौकशी आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेत वेळ गेल्याने त्यांचे लंडनचे विमान सुटले. या प्रकारामुळे डॉ. पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच आधारे लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले असल्याची माहिती आहे.

डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात भाजप आणि तिच्या काही नेत्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखिल श्यामराव भामरे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यानंतर संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे आता डॉ. पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले असून, हा विषय अधिकच गंभीर बनला आहे.


Protected Content

Play sound