अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वासरे येथील रहिवासी राजेंद्र सीताराम पाटील यांचा मुलगा निलेश राजेंद्र पाटील याची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) या केंद्रीय सुरक्षा दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. निलेशच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत त्याचा जंगी सत्कार केला.

नुकताच बीएसएफच्या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निलेश पाटील याने यश मिळवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. शिक्षणासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना बीसीएचे शिक्षण घेत असतानाच त्याने ही परीक्षा दिली आणि यशाला गवसणी घातली.

निलेशच्या निवडीचा आनंद गावकऱ्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गाववेशीपासून डीजेच्या तालावर घोड्यावर तसेच खांद्यावर बसवून निलेशची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निलेश व त्याच्या पालकांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
देशसेवेच्या मार्गावर पाऊल टाकणाऱ्या निलेश पाटील याच्या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, निलेशने आपल्या कर्तृत्वाने वासरे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.



