Home राजकीय BMC निकाल हे भाजपवरील जनतेच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

BMC निकाल हे भाजपवरील जनतेच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक – पंतप्रधान नरेंद्र मोदी


कालियाबोर (आसाम)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधून भाष्य करत भाजपच्या वाढत्या लोकप्रियतेचा दावा केला आहे. “विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे,” असे ठाम शब्दांत सांगत मोदींनी देशभरातील निवडणूक निकाल हे भाजपवरील जनतेच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले.

आसाममधील कालियाबोर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज भाजप ही देशभरातील जनतेची पहिली पसंत बनली आहे. गेल्या दीड वर्षांत भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत गेला असून, याचे प्रतिबिंब विविध राज्यांतील निवडणुकांच्या निकालांतून स्पष्टपणे दिसत आहे. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने २० वर्षांनंतरही भाजपला विक्रमी संख्येने मतदान केले आणि पक्षाने ऐतिहासिक जागा जिंकल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईत पहिल्यांदाच भाजपला विक्रमी जनादेश मिळाला असून, महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमधील जनतेने भाजपला सेवा करण्याची संधी दिली आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी मोदींनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, त्याच शहरात काँग्रेस आज चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, हे देशातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे स्पष्ट संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. अलीकडील निवडणुकांचे निकाल पाहता, देशातील मतदारांना आता केवळ ‘सुशासन’ आणि ‘विकास’ हवा असून, भाजप विकास आणि वारसा या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असल्यानेच जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

ईशान्य भारताबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या भागातील सर्वात मोठी समस्या ‘अंतर’ ही राहिली आहे. हे अंतर केवळ भौगोलिक नव्हते, तर मनाचेही होते. देशाच्या इतर भागांत विकास होत असताना आपण मागे राहिलो आहोत, अशी भावना इथल्या जनतेच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, ‘डबल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून भाजपने दशकभर दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्य भारताचा विश्वास पुन्हा मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले.

आसामला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. पूर्वी आसामसाठी रेल्वे बजेट अवघे २,००० कोटी रुपये होते, ते भाजप सरकारने आता वर्षाला १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवले असल्याचा उल्लेख करत त्यांनी केंद्र सरकारच्या विकासात्मक धोरणांवर भर दिला.


Protected Content

Play sound