अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोर धरू लागले आहे. निवडणूक यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली असून, उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. अशा वातावरणात नंदूरबारमध्ये घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे.

नंदूरबार शहरात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना शहर पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. शिरीष चौधरी यांच्याविरोधात दरोडा तसेच अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापन प्रक्रियेत शिरीष चौधरी यांचे पुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्ष पद मिळाले होते. या निवडीनंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे हिंसक वळणावर गेला असून, त्याच रात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी तोडफोड झाल्याची घटना घडली होती.
या प्रकारानंतर नंदूरबार शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना अटक केली. मात्र, अटकेनंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, माजी आमदार चौधरी यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे नंदूरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढील तपासात पोलिस कोणती दिशा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



