मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला असून, एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील दावोस दौऱ्यावर पोहोचले असताना, दुसरीकडे मुंबईतील सत्तासमीकरणांवरून शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याची चर्चा रंगली आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दोन वाक्यांच्या टीकेने एकनाथ शिंदे यांच्या गटात खळबळ उडाल्याचे बोलले जात असून, नगरसेवकांच्या फोनाफोनीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संजय राऊत यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील किंवा अपहरण होतील, अशी भीती वाटत असेल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी हास्यजत्रा असल्याचा टोला लगावला. ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांनाच आता स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी, हे आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी म्हटले. आमदारांना सुरतला नेले आणि नगरसेवकांना मुंबईतच कोंडून ठेवले जात आहे, यावरून सुरत हीच सुरक्षित जागा असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

नगरसेवकांना स्वतःच्या राज्यात लपवून ठेवण्याची वेळ येत असेल, तर त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकाच गटाचे असूनही नगरसेवकांना बंदिस्त ठेवावे लागत असेल, तर प्रशासनिक व्यवस्था अपयशी ठरल्याचे हे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. “तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार?” असा थेट सवाल करत, हे नगरसेवक मुळचे शिवसेनेचेच असून त्यांच्या मनात मराठी अस्मितेची ज्योत आजही धगधगत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये, हीच सर्वांची भावना असल्याचे सांगत, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचाच महापौर होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही “देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर होईल” असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
दरम्यान, ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार शिंदे गटातील काही नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी फोनवर संवाद साधल्याचे समजते. आमच्या मनात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याविषयी कोणतेही वैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याचीही चर्चा आहे. या घडामोडींची कुणकुण लागताच एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये पाचारण केल्याचे बोलले जात आहे, तर आता त्याच हॉटेलमध्ये संजय राऊत पोहोचणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सत्तेच्या समीकरणांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, बहुमत कितीही मोठे असो वा छोटे असो, ते चंचल असते. बहुमत हे पाऱ्यासारखे असते, कधीही सरकू शकते. जर सगळे काही इतकेच मजबूत असते, तर २९ नगरसेवक स्वतःच्या राज्यात कोंडून ठेवण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरही त्यांनी टीका करत, अनेक वर्षे ते तिथे जातात पण गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत नाही, त्यांची सगळी गुंतवणूक निवडणुकांमध्येच असते, असे म्हणत राजकीय कटाक्ष साधला.
अमित शहांच्या पक्षाचा महापौर मुंबईत बसवण्याचा प्रयत्न फडणवीस यांना मान्य होईल का, असा प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, ही शिवसेना नसून अमित शहांची सेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुंबई भाजपच्या घशात घातली, तर बाळासाहेब ठाकरे त्यांना कधीच माफ करणार नाहीत, असा घणाघातही त्यांनी केला.



