Home धर्म-समाज मोठे वाघोदे येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात संपन्न 

मोठे वाघोदे येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात संपन्न 


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील वाघोदे बुद्रुक (मोठे वाघोदे) येथे अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय श्रीमद् भागवत कथा, श्रीकृष्ण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि तरुण मित्र मंडळ वाघोदे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गाव अध्यात्मिक आनंदाने न्हाऊन निघाले.

दिनांक ८ ते १५ जानेवारी या कालावधीत संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम संकीर्तन व संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात भागवताचार्य ह.भ.प. महंत समाधानजी महाराज भोजेकर हे प्रमुख कथा वक्ते म्हणून उपस्थित होते. विविध संत-महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत कथा, कीर्तन व नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तांना अध्यात्मिक अनुभूती मिळाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षे पूर्तीनिमित्त कार्यक्रमाची सुरुवात ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या प्रार्थनेने व ‘भारत माता की जय’ या घोषणांनी करण्यात आली. यावेळी सिंगणूर (ता. रावेर) येथील रहिवासी, मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य सचिव प्रा. संजय मोरे व सौ. मायाताई संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात प्रल्हाद कापसे, श्रावण महाजन, माजी मुख्याध्यापक गंभीर महाजन सर, सुपडू बाबा भगत, बाजीराव महाजन, राजाराम पवार, हरी कराड, हरी महाजन, वामन पाटील व सखाराम पवार यांना रुमाल, टोपी, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. तसेच गावातील ज्येष्ठ माता गयाबाई पवार व कमलबाई कराड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ११ बाल टाळकरी महाराजांनाही ड्रेस, टोपी, रुमाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.

संध्याकाळी गु.ह.भ.प. गुरुदत्त उपासक श्रीहरी महाराज (दत्त संस्थान, बीड) यांच्या दर्शनाचा भव्य सोहळा पार पडला. या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली. दुपारी १२ ते ३ या वेळेत आयोजित महाप्रसादालाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

संध्याकाळी ५ वाजता भागवताचार्य ह.भ.प. महंत समाधानजी महाराज यांच्या उपस्थितीत मुख्य मार्गावरून भव्य ग्रंथदिंडी सोहळा काढण्यात आला. या दिंडीत वाघोदे बुद्रुकसह परिसरातील हजारो भाविकांनी हरिनामाच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी रमेश पाटील, विजयकुमार बाजीराव पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. भक्ती, एकात्मता आणि संस्कारांची जोपासना करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound