Home Cities जळगाव निवडणुकीत पराभव तरीही जळगावात अपक्ष उमेदवाराची आभार रॅली 

निवडणुकीत पराभव तरीही जळगावात अपक्ष उमेदवाराची आभार रॅली 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात प्रभाग क्रमांक तीन ‘ब’ मधील अपक्ष उमेदवाराच्या पराभवाची जोरदार चर्चा सुरू असून, निकालानंतर घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या १४७ मतांनी पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवार चैताली राहुल ठाकरे यांनी पराभव स्वीकारत असतानाही थेट जनतेमध्ये उतरून आभार रॅली काढल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या रॅलीदरम्यान मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप करत आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रभाग क्रमांक तीन ‘ब’ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रतीक्षा कैलास सोनवणे या विजयी ठरल्या असून, चैताली ठाकरे यांचा केवळ १४७ मतांनी पराभव झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर आमदार मंगेश चव्हाण दाखल झाल्यावरच परिस्थिती बदलली आणि दबाव तंत्राचा वापर करून फेरमतमोजणीसाठी अधिकाऱ्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप चैताली ठाकरे आणि त्यांच्या पतीने केला आहे. या घटनेमुळे आपल्यावर अन्याय झाला असून हा पराभव मान्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

निकालानंतरही खेडी परिसरात काढण्यात आलेल्या आभार रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. “आमच्या मनातील नगरसेवक चैताली ताईच आहेत,” अशा भावना नागरिकांनी उघडपणे व्यक्त करत अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार दाखवला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांचा तीव्र निषेध करण्यात आला, तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

चैताली ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मतमोजणी केंद्रावर आमदारांनी दबाव आणून फेरमतमोजणी करवून घेतली आणि त्यामुळेच निकाल बदलल्याचा संशय आहे. जनतेने दिलेला कौल आपल्याच बाजूने होता, मात्र प्रशासकीय यंत्रणेवर राजकीय दबाव आणल्यामुळे हा अन्याय सहन करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की, लोकांचा विश्वास आणि पाठिंबा हा खरा विजय असून त्यासाठीच पराभवातही आभार मानण्यासाठी रॅली काढण्यात आली.

या संपूर्ण प्रकारामुळे जळगावातील निवडणूक प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, अपक्ष उमेदवारावर झालेल्या कथित अन्यायामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, पुढील काळात या वादावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound