Home Cities अमळनेर गुंडगिरीला अमळनेरकरांनी कायमचे बाजूला सारावे – आमदार अनिल पाटील

गुंडगिरीला अमळनेरकरांनी कायमचे बाजूला सारावे – आमदार अनिल पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नंदुरबार येथे घडलेल्या धक्कादायक हिंसाचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून, या प्रकरणात अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे या घटनेचे वास्तव उघड झाले असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एका माजी आमदाराने अशा प्रकारे गुंडगिरी करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब आहे. नंदुरबार येथे घडलेल्या घटनेचे व्हिडिओ त्यांनी मोठ्या डिजिटल स्क्रीनवर पत्रकारांना दाखवत “लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत, संपूर्ण प्रकाराची सुरुवात चौधरी बंधूंनीच केल्याचा दावा केला. सत्तेचा माज आल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधी गटाला चिडवण्यासाठी जाणीवपूर्वक हावभाव केले आणि त्यानंतर परिस्थिती चिघळल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, चौधरी बंधू एवढ्यावरच न थांबता, आपल्या समर्थकांची मोठी टोळी घेऊन एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी घुसले. तेथे संबंधित कार्यकर्त्याला कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली, धमक्या देण्यात आल्या आणि हा सगळा प्रकार व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. एका लोकप्रतिनिधीने गुंडासारखे वर्तन करणे अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घटनेनंतर संतप्त जमावाने चौधरी यांच्या घरावर हल्ला केला, हे “ॲक्शनला रिऍक्शन” असल्याचे सांगत पाटील यांनी सुरुवातीला निरपराध असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न फसला, कारण मारहाणीचे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सत्य जनतेसमोर आले, असे स्पष्ट केले. नंदुरबार पोलीस प्रशासनाने अशा व्यक्तीच्या मिरवणुकीला परवानगी दिलीच कशी, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

अमळनेरची संस्कृती ही शांतता, सहअस्तित्व आणि विकासाची असल्याचे सांगत पाटील म्हणाले की, आतापर्यंत अमळनेर मतदारसंघात अनेक लोकप्रतिनिधी झाले, मात्र कधीच अशा प्रकारचे हल्ले किंवा गुंडगिरी पाहायला मिळाली नाही. सोशल मीडियावर टीका झाली तरी आम्ही ती खिलाडू वृत्तीने स्वीकारली, कधीही शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही, याउलट चौधरी गटाकडून धमक्या व दहशतीचे राजकारण सातत्याने केले जाते, असा आरोप त्यांनी केला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना उद्देशून बोलताना आमदार पाटील म्हणाले की, जनतेचा कौल मान्य असून विकासकामांसाठी सहकार्य राहील, मात्र गुंड प्रवृत्तीला पाठबळ देऊ नये. अन्यथा जनतेशी विश्वासघात होईल आणि अमळनेरची जनता ते कधीच माफ करणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

पालिकेच्या निवडणुकीनंतर अमळनेरचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र महिलांनी व नागरिकांनी त्याला जोरदार उत्तर दिले, असे सांगून पाटील म्हणाले की, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ही भूमी गुण्यागोविंदाने नांदत आली आहे. स्वार्थासाठी जर कुणी दहशत पसरवत असेल तर वेळीच सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रकरणात एट्रोसिटी, विनयभंग, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असून, चौधरी बंधूंसह संबंधितांवर कधीही अटकेची कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. “कायद्यासमोर कुणीही मोठे नाही, कोणत्याही पक्षात असलात तरी चुकीला माफी नाही,” असे ठाम मत व्यक्त करत, अशा प्रवृत्तीचे समर्थन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नंदुरबार येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी करणार असून, हा विषय विधानसभेतही मांडणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली.


Protected Content

Play sound